लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासन प्रक्रियेतून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना रुजू करून घेणे, कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेत जोमात सुरू आहे. सोमवारपर्यंत जिल्हा परिषदेतून बाहेर जाणाऱ्या शिक्षकांची संख्या ५० तर येणाऱ्या शिक्षकांची संख्या ४३ असल्याची माहिती आहे. शासनाने आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी शिक्षकांना आॅनलाइन माहिती भरण्याचे पर्याय देण्यात आले. त्यानुसार इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या शिक्षकांच्या आदेशाचा जिल्हा परिषदेत भडिमार सुरू आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेत रुजू करून घेण्यासाठी सोमवारपर्यंत ४३ शिक्षकांचे आदेश आले आहेत. तर जिल्हा परिषदेतून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५० शिक्षकांच्या बदल्या शासनाने केल्या आहेत. त्यामुळे आलेल्या शिक्षकांना रुजू करून घेणे, जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची लगबग शिक्षण विभागात सुरू आहे. अमरावती जिल्हा परिषदेतून अकोल्यात सहा शिक्षक आले आहेत. अकोला जिल्हा परिषदेतून इतर जिल्हा परिषदेत जाण्यासाठी बदली झालेल्या ५८ मराठी माध्यम आणि ८ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांना उद्या मंगळवार सायंकाळपर्यंत कार्यमुक्त करा, असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांनी सोमवारी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना दिला. त्यानुसार उद्या सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सोमवार सायंकाळपर्यंत ६६ पैकी ३० शिक्षकांचेच प्रस्ताव सादर झाल्याची माहिती आहे. उर्वरित ३६ शिक्षकांचे प्रस्ताव उद्यापर्यंत सामान्य प्रशासन विभागातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पोचवणे आवश्यक आहे.
५० शिक्षक जाणार, ४३ येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:34 AM