लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सराफा व्यावसायिकाच्या कुरिअर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी रोजी लुटमार करणार्या चोरट्यांची माहिती देणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने ५0 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या चार चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेले छायाचित्र पोलिसांनी जारी केले असून, सदर वर्णनाचे चोरटे कुणालाही दिसल्यास त्यांनी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. प्रशांत कुरिअरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरिअर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हे कुरिअर बॉय म्हणून कामाला आहेत. ते मुंबई-हावडा मेल एक्स्प्रेसने ७ फेब्रुवारी रोजी रात्री मुंबई येथून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. ८ फेब्रुवारीच्या पहाटे अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी रेल्वेस्थानकाच्या वाहनतळातील स्वत:ची दुचाकी क्रमांक एमएच ३0 एन ४४९२ काढल्यानंतर समोरील चौकात आले असता पोलीस चौकीजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी थांबवून काकड यांच्याकडील १६ लाख १५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला; मात्र आठ महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही चोरट्यांची माहिती मिळत नसल्याने त्यांची माहिती देणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने ५0 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही नागरे यांनी स्पष्ट केले आहे.
मालकाची व कुरिअर बॉयची चौकशीया लुटमारप्रकरणी काकड यांच्याकडील रोकड आणि दागिने लुटीची ही तिसरी घटना असल्याने पोलिसांचा प्राथमिक तपासात संशय काकड व त्यांचे मालक शहा यांच्यावरच होता. त्यामुळे शहा आणि काकड यांची कसून चौकशी पोलिसांनी केली होती.
‘एमपी’मध्ये घेतला होता शोध या प्रकरणातील चोरट्यांचा शोध सुरू केल्यानंतर ही टोळी मध्य प्रदेशातील असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने मध्य प्रदेशात तसेच अमरावतीमधील बडनेरा येथे पोलिसांनी शोध घेतला होता; मात्र पोलिसांच्या हातात आतापर्यंत काहीच लागले नसल्याचे वास्तव आहे.