सचिन राऊत /अकोला
गर्भधारणा झाल्याचे कळताच महिलेसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण.. मात्र विविध चाचण्या केल्यानंतर.. एड्स या भयानक आजाराची लागण झाल्याचे समोर आले.. गर्भातील मुलालाही याचा धोका असल्याने त्याने बाहेरचे जग बघण्याआधीच त्याचा गळा घोटण्याची तयारी. मात्र ह्यन्यू प्रीव्हेंशन ऑफ पॅरेंट टु चाइल्ड ट्रान्समिशनह्ण (पीपीटीसीटी एमडीआर) या उपचार पद्धतीमुळे एचआयव्ही बाधित गर्भवतींनी ५0६ निरोगी मुलांना जन्म दिला आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आयुष्य जगण्यापेक्षा या कळय़ा गर्भातच खुळण्याची मानसिकता त्यांच्या माता-पित्यांचीच होती; परंतु एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रमामुळे या कळय़ा खुळण्याआधी आता निरोगीपणाने खुलल्या आहेत. मुंबई वगळता राज्यातील ३४ जिल्हय़ांमध्ये १ एप्रिल ते ३0 सप्टेंबर या कालावधीत ९ लाख २0 हजार ९७0 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. यामधील १ हजार १२४ गर्भवती महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आल्या, त्यामुळे त्यांच्या मनात गर्भातील कळी खुळण्याचे विचार थैमान घालू लागले. मात्र योग्यवेळी एड्स प्रतिबंधक पथकाचा आधार मिळाला. या पथकाद्वारे करण्यात आलेल्या ह्यपीपीटीसीटी एमडीआरह्ण उपचार पद्धतीमुळे यामधील ५0६ बाळांना निरोगी जन्म मिळाला आहे. ४६७ गर्भवती महिलांची अद्यापही प्रसूती झालेली नसून, राज्यातील ४६ गर्भवती महिला उपचारादरम्यान अज्ञातस्थळी निघून गेल्याचे वास्तव समोर आले आहे. महिला गरोदर असताना एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्याने ८२ महिलांनी गर्भपात केला असून, प्रसूतीच्या वेळी राज्यातील २३ बाळांचा मृत्यू झाला आहे. ४६७ गर्भवती महिलांचे बाळ आता निरोगी जन्माला येणार असल्याचा विश्वास एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कार्यक्रम राबविणार्या अधिकार्यांना आहे. या कार्यक्रमामुळे राज्यातील ५0६ बाळ निरोगी जन्माला आले असून, हे मोठे यश आहे.