अकाेला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मंगळवारी स्थापनेचा ५१ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी यानिमित्ताने तीन दिवसीय विदर्भस्तरीय शिवारफेरीचे आयोजन अतिशय हर्षोल्हासात करण्यात येते; मात्र यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर औपचारिक स्वरूपात एक दिवसीय शिवारफेरीचे आयोजन अकोला मुख्यालयात करण्यात आले होते. विस्तार शिक्षण संचालनालयाच्या परिसरात आयोजित छोटेखानी उद्घाटनप्रसंगी प्रथम नोंदणी करणाऱ्या महिला शेतकरी सरस्वती इंगळे, रा. गोरेगाव यांच्या शुभहस्ते फीत कापून एक दिवसीय शिवारफेरीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रसंगी शेतकरी प्रतिनिधी म्हणून विशेषत्वाने उपस्थित असलेले विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांच्यासह विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता कृषी डॉ. महेंद्र नागदेवे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित शेतकरी वर्गांनी सेंद्रिय शेती विकास प्रकल्प, कापूस संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्र, मिरची तथा भाजीपाला संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, कोरडवाहू शेती विकास केंद्र, फळसंशोधन केंद्र, यंत्रे तथा अवजारे विभाग तथा पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाला भेटी देत प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेतले. शिवार फेरीसाठी केवळ ५० शेतकरी बांधवांना उपस्थित होण्याची परवानगी मिळाली असल्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दत्तक ग्राम कौलखेड गोमासे, गोरेगाव, सिंदखेड, भौरद, म्हातोडी आदी गावातील प्रत्येकी १० शेतकरी बंधू-भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात शिवारफेरीसाठी सहभागी करून घेण्यात आले होते.