अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाॅटेल जसनागरा येथे मोठ्या प्रमाणात विजेची चोरी सुरू असताना पोलीस व महावितरणच्या पथकाने छापेमारी करून ही चोरी पकडली. सुमारे ५२ लाख रुपयांच्या या वीज चोरी प्रकरणात हॉटेलचा मालक जसपालसिंग नागरा याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला. त्यामुळे नागराच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, पोलिसांनी या प्रकरणात तरी नागराला अटक करण्याची अपेक्षा अकोलेकरांकडून करण्यात येत आहे.
रेल्वे स्टेशनसमोरील परिसरात असलेले हाॅटेल जसनागरा हे शहरातील सर्वात मोठे हॉटेल असून, येथे मोठ्या प्रमाणात वीज चोरी सुरू असल्याची माहिती पोलीस व महावितरणच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून संयुक्त पथकाने जसपालसिंग नागरा याच्या मालकीच्या हाॅटेल जसनागरा येथे छापा टाकून वीज चोरी पकडली. आठ ऑक्टोबर रोजी ही वीज चोरी पकडल्यानंतर जसपालसिंग नागरा याच्याविरुद्ध अकोट फैल पोलीस ठाण्यात १३ ऑक्टोबर रोजी कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जसपालसिंग नागरा याने फरार होत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली; मात्र न्यायालयाने शनिवारी आरोपी जसपालसिंगचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे जसपालसिंग नागरा याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, अकोट फैल पोलिसांनी आरोपीस या प्रकरणात तरी अटक करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.