पातूर : पातूर तालुक्यात मुदत संपणाऱ्या २३ ग्रामपंचायतींच्या २२१ जागांसाठी ४७३ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. एकूण ५२ हजार २०७ मतदार मतदानाचा हक्क शुक्रवारी बजावणार आहेत. पातूर तालुक्यात मुदत संपणाऱ्या २३ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
तालुक्यात ८७ मतदान केंद्र निवडणूक विभागाकडून सज्ज ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने चरणगाव २, आलेगाव ७, सस्ती ४, खानापूर ३, बेलुरा बुद्रुक ३, बेलुरा खुर्द ३, दिग्रस खुर्द ३, तांदळी बुद्रुक ३, पास्टुल ३, शिर्ला ६, मलकापूर ३, भंडारज खुर्द ३, देऊळगाव ३ अशी चानी पोलीस स्थानकांतर्गत एकूण १३ आणि पातूर पोलीस स्थानकांतर्गत ३३ केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित केली आहेत. याठिकाणी पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. एक जिल्हा पोलीस उपअधीक्षक, एक पोलीस इन्स्पेक्टर, ११ पोलीस सबइन्स्पेक्टर, १५२ पोलीस कर्मचारी, ७० होमगार्ड जवान तैनात केल्याची माहिती ठाणेदार हरिश गवळी यांनी ‘लोकमत’ला दिली.
निवडणूक मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी ३४८ कर्मचारी, १० निवडणूक निर्णय अधिकारी व राखीव निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याबरोबरच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. दोन-दोन तासाला मतदान केंद्रावरील स्थितीचा आढावा तहसील कार्यालयातील वाॅर रुममध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार दीपक बाजड, निवडणूक नायब तहसीलदार विजय खेडकर यांनी दिली. दुपारपर्यंत गावागावांना निवडणूक पथके रवाना झाली आहेत. पोलीस पथकांनी आपापल्या मतदान केंद्रावर पूर्वतयारी सुरू केली आहे. तालुक्यात शांततेने मतदान पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.