- संतोष येलकरअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी विहित कालावधीत ‘आॅनलाइन’ अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील ५२ हजार २२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली. कर्जमाफीसाठी गत २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यां कडून ‘आॅनलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज केले होते. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात १ लाख ९१ हजार १८७ थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी यापूर्वी विहित कालावधीत आॅनलाइन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनामार्फत गत २८ फेबु्रवारी रोजी घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे आॅनलाइन अर्ज १ ते ३१ मार्च या कालावधीत ‘आपले सरकार’ सेतू सेवा केंद्रामार्फत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या मात्र विहित कालावधीत वैयक्तिक व तांत्रिक कारणामुळे आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या जिल्ह्यातील थकबाकीदार ५२ हजार २२५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
अर्ज केलेले आणि अर्ज करण्यापासून वंचित असलेले शेतकरी
कर्जमाफीसाठी यापूर्वी आॅनलाइन अर्ज केलेले शेतकरी - १३८९६२कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करू न शकलेले शेतकरी - ५२२२५
----------------------------------------------------------------------------------
एकूण - १९११८७
‘येथे ’ उपलब्ध आहे अर्जाचा नमुना!कर्जमाफीसाठी यापूर्वी आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या शेतकºयांना ३१ मार्चपर्यंत आपले सरकार सेतू सुविधा केंद्रामार्फत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, तालुका उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत उपलब्ध राहणार आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत यापूर्वी विहित कालावधीत कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करू न शकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांचे अर्ज शासन निर्णयानुसार ३१ मार्चपर्यंत आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)