अकोला : राष्ट्रीय, तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ५ हजार २८६ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व दिवाणी, फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबीक, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग येथे राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी घेण्यात आली.
सर्व न्यायालयांत प्रलंबित प्रकरणांपैकी १३ हजार ४७८ प्रकरणे लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली. त्यापैकी २ हजार १३३ प्रलंबित प्रकरणांमध्ये यासोबतच ३ हजार १५३ दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये एकूण ५ हजार २८६ प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती जिल्हा सेवा विधी प्राधिकरणाचे सचिव योगेश सु. पैठणकर यांनी दिली.
लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद स्वरुपाची, तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एनआय ॲक्ट आणि ग्रा. पं. घरपट्टी, पाणीपट्टी, तसेच महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात सुमारे ३४ कोटी ८४ लाख ३३ हजार ९१९ रुपयांची तडजोड झाल्याची माहिती आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. के. केवले यांचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले.
अधीक्षक डी. पी. बाळे, वरिष्ठ लिपीक संजय रामटेके, राजेश देशमुख, हरिश इंगळे यांनी परिश्रम घेतले. अकोला बार असोसिएशन, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांचे सहकार्य लाभले.