अकोला : अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जुलैमध्ये नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून प्राप्त झालेली ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली असून तहसीलदारांकडून बाधितांना मदतीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात गत जुलै महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये घरांचे पूर्णत: आणि अंशत: नुकसान, जनावरांचा मृत्यू, गोठे, दुकान, कुक्कुटपालन शेड आणि खरडून गेलेली शेतजमीन आदी नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनामार्फत ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदतनिधी १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली असून, तहसील कार्यालयांमार्फत नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
तालुकानिहाय अशी वितरित
करण्यात आली मदत !
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. त्यामध्ये अकोला ४३ कोटी १ लाख ७७ हजार रुपये, बार्शीटाकळी १ कोटी ८० लाख ९९ हजार ९९ हजार रुपये, अकोट १ कोटी ७४ लाख २० हजार रुपये, तेल्हारा ४९ लाख ८१ हजार रुपये, बाळापूर ७ कोटी ६२ लाख ५ हजार रुपये, पातूर १५ हजार रुपये आणि मूर्तिजापूर तालुक्यासाठी ३ लाख २० हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.