अकोला : अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात गत जुलैमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यामध्ये घरांचे नुकसान झालेल्या बाधित कुटुंबांसह शेतजमीन खरडून गेलेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांची मदत शासनामार्फत शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अनेक घरांचे नुकसान झाले. तसेच शेतजमीन खरडून गेली आणि शेतातील पिकांचेही प्रचंड नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर जुलैमधील अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात घरांची पूर्णत: आणि अंशत: झालेली पडझड, गोठे, खरडून गेलेली शेतजमीन, जनावरांचा मृत्यू, दुकानांचे झालेले नुकसान आदी नुकसान भरपाईपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या महसूल विभागामार्फत १६ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात घरांचे नुकसान झालेल्या बाधित कुटुंबांसह शतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील संबंधित अतिवृष्टीग्रस्त कुटुंब आणि शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
........................................................................