कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. गत वर्षी एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महिनाभरात तिघांचा मृत्यू झाला होता, मात्र यानंतर मृत्यूचा आलेख वाढताच राहिला. गतवर्षी सर्वाधिक ८४ मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले होते. त्यामुळे अकोलेकरांमध्ये धडकी भरली होती, मात्र सप्टेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्यावाढीसोबतच मृत्युदरावर काही प्रमाणात अंकुश लावण्यात आरोग्य विभागाला यश आले होते. त्यामुळे लोकांमधील कोरोना विषयीची भीतीही कमी होऊ लागली. दिवाळीनंतरही परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात होती, मात्र बाजारपेठेत नागरिकांकडून झालेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. नव्या वर्षात पुन्हा रुग्णसंख्या वाढीला सुरुवात झाली. फेब्रुवारी २०२१ पासून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली, ती अजूनही कायम आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक ८६ रुग्णांचा मृत्यू झाला, मात्र एप्रिल महिन्यात हा वेग दुप्पट दिसून येत आहे. गत ११ दिवसांत ५५ जणांचा मृत्यू झाला असून, परिस्थिती गंभीर आहे.
विषाणूतील बदल ठरतोय घातक
जणूकीय बदल झालेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे दिसून आले. रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुरुवातीच्या तीन ते चार दिवसांतच गंभीर बदल दिसून येतात. त्यामुळे रुग्णाला गंभीर अवस्थेतच रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावे लागत आहे.
ही आहेत मृत्यूची कारणे
अनेक जण कोविड लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे उपचारास विलंब होतो.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही.
त्यामुळे त्याचा मृत्यू होतो.
या शिवाय, अनेक रुग्णांना मधूमेह, उच्चरक्तदाब यासह इतर आजारही असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
असे वाढले रुग्ण (२०-२१)
महिना - मृत्यू
एप्रिल - ०३
मे - २९
जून - ४७
जुलै - ३४
ऑगस्ट - ४७
सप्टेंबर - ८४
ऑक्टोबर - ४५
नोव्हेंबर - १२
डिसेंबर - २९
जानेवारी - १४
फेब्रुवारी - ३१
मार्च - ८६
एप्रिल - ५५ (११ एप्रिलपर्यंत)