अकोला: जिल्ह्यातील खरीप पिकांची २0१५-१६ या वर्षातील सुधारित नजर अंदाज पैसेवारी मंगळवारी जिल्हाधिकार्यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यातील केवळ ५५ गावांची नजर पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आहे. जिल्ह्याची पैसेवारी ५९ पैसे आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या नजर पैसेवारीनुसार संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या निकषात बसणारा होता. आता मात्र जिल्ह्यातील ५५ गावे दुष्काळात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाने यावर्षी पैसेवारीच्या सुधारित निकषानुसार निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ६३ पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे दुष्काळग्रस्त समजली जाणार होती. या निकषानुसार अकोला जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यातील गावे दुष्काळाच्या निकषात बसणारी होती. संपूर्ण राज्यातच ही परिस्थिती असल्याने अखेर पैसेवारीच्या जुन्याच पद्धतीनुसार गावनिहाय पैसेवारी जाहीर करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना देण्यात आले होते. त्यानुसार अकोला जिल्हय़ाची खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ९९७ गावांची पैसेवारी सरासरी ५९ पैसे आहे. ९४२ गावांची पैसेवारी ही ५0 पैशांपेक्षा अधिक असून, केवळ ५५ गावांची पैसेवारी ५0 पैशांच्या आत आहे. यात बाळापूर तालुक्यातील २0 गावे आणि तेल्हारा तालुक्यातील ३५ गावांचा समावेश आहे.
५५ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी!
By admin | Published: September 30, 2015 2:08 AM