----------------------------------------
मूर्तिजापूर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २४९ सदस्यपदांसाठी ६७७ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते, त्यापैकी सोनोरी (बपोरी) व मोहखेड या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध निश्चित झाल्याने १४ उमेदवार कमी झाले. तसेच सोमवारी १०७ इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २३५ जागांसाठी ५७० उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत.
तालुक्यातील पारद, भटोरी, मंगरुळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपूर, कवठा (खोलापूर), बपोरी, कुरूम, माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु, कार्ली, राजुरा घाटे, खांदला, धानोरा (पाटेकर), निभा, विराहीत, कंझरा, अनभोरा, जामठी बु, हातगाव, चिखली, या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होऊ घातले आहे. सोनोरी येथून सात सदस्यपदांसाठी केवळ सातच अर्ज प्राप्त झालेल्या पहिल्याच दिवशी येथील निवडणूक अविरोध झाल्याचे निश्चित झाले होते, तर मोहखेड येथून सात जागांसाठी ८ अर्ज दाखल करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी एका इच्छुक उमेदवाराची मनधरणी करण्यात यश आल्याने ग्रामपंचायतीने ५० वर्षांपासूनची अविरोध परंपरा कायम ठेवली आहे. ७ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असलेल्या मोहखेड आणि सोनोरी (बपोरी) या २ ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली आहे.
----------------------------------------
मोहखेड ग्रा.पं.ची ५० वर्षांची परंपरा कायम
ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता येण्यासाठी इच्छुक उमेदवार धडपडत असतो. एकाच गावात विविध विचारांचे, विविध पक्ष समर्थक नागरिक असल्याने अविरोध निवडणूक अशक्यप्राय असते; मात्र मोहखेड गट ग्रामपंचायत त्यासाठी गत ५० वर्षांपासून अपवाद ठरत आहे. स्वातंत्र्यानंतर केवळ एकदाच गावात निवडणूक झाली. तेव्हापासून सतत एकही निवडणूक न लढता चार गावांचे नागरिक एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक अविरोध करीत असल्याने ही परंपरा आजही कायम आहे. चार गावांतून प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या गावाला सरपंचपदाची संधी दिली जाते. यावेळी लांडापूर (बाळापूर येथून सरपंचाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात ‘‘लोकमत’’ने २२ डिसेंबर रोजी ‘मोहखेड राखणार बिनविरोध ग्रामपंचायतीची परंपरा!’ असे वृत्त प्रकाशित करून भाकीत वर्तविले होते, ते अगदी खरे ठरले.