- सागर कुटे
अकोला : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत ६४ टक्के पीक कर्जवाटप झाले आहे; परंतु अद्यापही ५७ हजार ७८० शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यात आले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा लागली आहे.
काेराेनामुळे गत वर्षीपासून शेतकरी संकटात सापडलेले आहेत. शेतमाल विकण्याच्या वेळीच निर्बंध लावण्यात येत असल्याने भाव मिळाला नाही. यावर्षीही तीच परिस्थिती हाेती. २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नगदी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला हाेता. या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. पीक कर्ज मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत; मात्र त्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात यावर्षी १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना १,१४० काेटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले हाेते. त्यापैकी ३१ ऑगस्टपर्यंत ८४ हजार ७२० शेतकऱ्यांना ७७३ काेेटी ९५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. ५६ टक्के शेतकऱ्यांना हे कर्जवाटप करण्यात आले असून, ४४ टक्क्यांच्या जवळपास शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात जिल्ह्यात काही दिवसांआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणखी अडचणी वाढल्या आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांकडून ४४ टक्के कर्ज वाटप
पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण हाेत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना खरिपात ४२३ कोटी ७२ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी १९७ कोटी ९३ लाख रुपये कर्जवाटप झाले. उद्दिष्टाच्या केवळ ४४ टक्के वाटप झाले आहे.
जमिनी खरडल्या, पुन्हा आर्थिक संकट
यंदा जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे उशिरा का होईना, शेतकऱ्यांनी पेरणी केली. या आठवड्यात बहुतांश पेरण्या झाल्या. त्यामुळे पीकही चांगले बहरू लागले; मात्र २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. पिकांचेही मोठे नुकसान झाले. हे नुकसान कसे भरून निघणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट
१,१४० कोटी
झालेले पीक कर्जवाटप
७७३ कोटी
बँकनिहाय कर्जवाटप
सार्वजनिक क्षेत्रातील बँक
१९७ कोटी ९३ लाख
खासगी क्षेत्रातील बँक
६ कोटी १६ लाख
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
४७३ कोटी २४ लाख
विदर्भ कोकण ग्रामीण बँक
९६ कोटी ६२ लाख