अकोला : जिल्ह्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात १४ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी ज्ञान-विज्ञानपरीक्षा दिली होती. या परीक्षेतून ५७७ विद्यार्थ्यांची ज्ञान-विज्ञान कार्यशाळा आणि अंतिम परीक्षेसाठी निवड करण्यात आली.८ सप्टेंबर रोजी १७६ केंद्रांवर ज्ञान-विज्ञान परीक्षेला जिल्हाभरातून १४ हजारांवर विद्यार्थी बसले होते. त्यामधून अ गटामध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या ५७७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ७ आॅक्टोबर रोजी अंतिम परीक्षेत अ गट विद्यार्थ्यांची रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्र विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील, तसेच ब गटात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व बौद्धिक क्षमता चाचणीवर ५0 गुणांचे ५0 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहील. परीक्षा संपताच रोबोटिक्स कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे प्रयोग हाताळायला मिळतील. अंतिम परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा दुपारी कौतुक सोहळा होईल. कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद करतील. यावेळी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक अरविंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहील. (प्रतिनिधी)