पांढूर्णा: पातूर तालुक्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने धरणे तुडुंब भरलेली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. येथून जवळच असलेल्या निर्गुणा चोंढी धरणातून शुक्रवारी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील जवळपास १९ गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, तालुक्यातील ५,८३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
यंदा अतिपावसामुळे खरीप हंगामात पिकांची नासाडी झाली होती. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांपासून आशा आहे. रब्बी हंगामासाठी निर्गुणा येथील चोंढी धरण हे वरदान ठरत आहे. शुक्रवारी धरणातून पाटबंधारे विभागातर्फे कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आले. यामुळे चोंढी, चारमोळी, घोटमाळ, जांभ, आलेगाव, कार्ला, पिंपळडोळी, शेकापूर, भानुस, सस्ती, आसोला, अंबाशी, चरणगाव, विवरा, देऊळगाव, बाभूळगाव, तांदळी ,बेलुरा आदी गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाच्यावतीने शुक्रवारी येथील धरणावर मशीनची पूजा करून पाणी सोडण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी वैभव आखाडे, आयुशी अग्रवाल, आत्तरकर, बाणचार, भावसर यांसह कर्मचारी उपस्थित होते. (फोटो)
------------------------
हरभऱ्याचे क्षेत्र वाढले!
यंदा परिसरात रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. चोंढी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गत वर्षी गव्हाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना नापसंती दर्शविली आहे, तसेच उन्हाळी भुईमूग पिकापासून शेतकऱ्यांना आशा आहे.