- रवी दामोदर
अकोला : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग किंवा राज्य स्तरावरील क्रीडा स्तरावरील स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या किंवा सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येत असून, यासाठी जिल्ह्यातून ५९५ खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना काळात स्पर्धा ठप्प होत्या. मात्र, या सवलतीच्या गुणांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे क्रीडा गुणांबाबतही खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत देण्यात येत आहे. २०२०-२०२१ या वर्षात परीक्षेसाठी इयत्ता दहावीचे ४६५ व बारावीचे १३० खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शासनाकडे सादर केले असून, या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणार आहेत.
दहावीचे खेळाडू विद्यार्थी : ४६५
बारावीचे खेळाडू विद्यार्थी : १३०
एकूण : ५९५
------------------------
२०२०-२०२१ या वर्षात क्रीडा गुण सवलतीसाठी इयत्ता दहावी व बारावीचे एकूण ५९५ खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत. या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळणार असून, भविष्यात त्यांचा फायदाच होणार आहे.
- दिनकर उजळे,
जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला.