शहरात कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षात घेता नगर परिषद कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून वळती केली आहे. अत्यावश्यक सेवा असताना कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता सतत गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, परस्पर सुटीचे अर्ज सादर करून कार्यालय सोडून निघून जाणे. यामुळे मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमास खोळंबा निर्माण होत आहे आदी कारणे समोर करून प्रेमेंद्र चौधरी (शिपाई), शिवा दीपक बोयत (सफाई कामगार), नारायण दिनेश पावाल (सफाई कामगार), हरी दुधडे (सफाई कामगार), सतीश खंडारे (सफाई कामगार) व महादेव फावडे (सफाई कामगार) या ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी २५ मे रोजी एका आदेशानुसार निलंबित केले आहे.
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ७९ महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतुदीनुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांना सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही व निलंबित काळात स्वतंत्र ठेवण्यात आलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी करणे अनिवार्य राहील, असेही आदेशात म्हटले आहे.
दोन शिक्षकांची वेतनकपात
आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात निष्काळजी केल्यामुळे मौलाना अबुल कलाम आझाद न.प. उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक रेहानाबी असलम खा, जे.बी. न.प. हिंदी विद्यालय येथील सहायक शिक्षक प्रभाकर शिरसाट यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे, तर काही शिक्षकांना सूचना देण्यात आल्या. तीन महिन्यांपूर्वी याच कारणावरून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते हे विशेष.