मूर्तिजापूर : सिरसो गायरान परिसरात असलेल्या शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सहा बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. वडीलांसोबत बकऱ्या चारत असलेली चिमुकली मात्र सुदैवाने बचावली. घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. गायरान झोपडपट्टीत राहणारे शत्रू रंगराव घोसले हे आपल्या पाच वर्षीय मुलगी खुशीला घेऊन बकऱ्या चारण्यासाठी शेजारील परीसरात गेले. बकऱ्या चारत असताना कुत्रे लागल्याने बकऱ्या बिथरल्याने विखुरलेल्या गेल्या. पैकी सहा बकऱ्या एका शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेच्या दिशेने पळाल्या त्या बकऱ्या जमीनीवर पडून असलेल्या लघु दाबाच्या विद्युत तारेत जाऊन अडकून पडल्या त्या बकऱ्याच्या पाठोपाठ पाच वर्षाची खुशी सुद्धा धावत आली. ती बकऱ्यांना स्पर्श करणार तेवढ्यात तिच्या पाठोपाठ धावत आलेल्या वडीलांनी तिला लगेच पकडून घेतल्याने अनर्थ टळला. यात शत्रू घोसले यांच्या सहा बकऱ्या दगावल्याने त्यात त्यांचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पंकज जोगी, केसाळे यांनी भेट दिली. तहसील कार्यालयाकडून पंचनामा करुन बकऱ्यांचे शवविच्छेदन करून अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येतणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.(शहर प्रतिनिधी)
वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ६ बकऱ्यांचा मृत्यू ; सुदैवाने चिमुकली बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:40 PM