अकोला : कोरोनाची लाट ओसरत असल्याने अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढती प्रवासी संख्या पाहता एसटी महामंडळाच्या अकोला विभागाने १ जूनपासून वाढीव बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये अमरावती, यवतमाळ व बुलडाणा या जिल्ह्यांसाठी ६० बस फेऱ्या सोडण्यात येणार आहे. तर ५८ बस फेऱ्या परत येणार आहे. सद्यस्थितीत बस फेऱ्या अत्यावश्यक सेवेसाठी सुरू आहेत. कोरोना काळात दीड वर्षापासून एसटी महामंडळाला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने वेळोवेळी एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठे नुकसान झाले. काही दिवसापासून एसटीची अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रवासी संख्या कमी असल्याने फेऱ्या ही कमी होत्या ; मात्र आता एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यात कोरोना रुग्णांची संख्याही घटत असल्याने, १ जूनपासून निर्बंधही शिथिल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे १ जूनपासून एसटी महामंडळाच्या अकोला विभागाने यवतमाळ, अमरावती, बुलडाणा विभागासोबतच मिळून फेऱ्यांची संख्या वाढविली आहे. यामध्ये अकोला विभागातून सुटणाऱ्या व परत येणाऱ्या अशा फेऱ्यांची संख्या मिळून ११८ फेऱ्या सोडण्यात येणार आहे.
तर वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता
दोन-अडीच महिन्यापासून कोरोनामुळे एसटीची प्रवाशी वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू आहे. मध्यंतरी कडक निर्बंधांमुळे १३ दिवस फेऱ्या बंद होत्या. आता हळूहळू फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. जून महिन्यात निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यास एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.
अकोला विभागातून सुटणाऱ्या फेऱ्या
अकोला-अमरावती ७, अकोट-अमरावती ६, अकोला-परतवाडा ६, वाशिम-अमरावती ६, अकोला-बुलडाणा ६, अकोला-खामगाव ८, अकोला-शेगाव ८, अकोला-यवतमाळ ६, अकोला-दिग्रस ६ फेऱ्या सोडण्यात येणार आहे.
औरंगाबाद फेरीही सुरू होणार
इतर जिल्ह्याप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यात जाण्यासाठी लवकरच बस फेरी सुरू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली आहे. याव्यतिरिक्त बसस्थानकावर पुरेशा प्रमाणात प्रवासी उपलब्ध झाल्यास बसेस सोडण्यात येणार आहे.
सोडण्यात येणाऱ्या फेऱ्या
६०
परत येणाऱ्या फेऱ्या
५८