अकोला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कोरोनाच्या भीतीमुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर जामिनावर सोडण्यात आले आहे; मात्र कैद्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले असून, कोरोनाची दहशत कमी झाल्यानंतर या कैद्यांना तातडीने कारागृहात परतावे लागणार आहे. गृहखात्याने दिलेल्या आदेशानंतर याची अंमलबजावणी राज्यभर करण्यात आली असून, जिल्हा व सत्र न्यायालयानेही पडताळणी करून या कैद्यांना सोडण्याचा आदेश दिला आहे.कोरोनावर मात करण्यासाठी सध्या सोशल डिस्टंसिंग हा एकमेव उपाय आहे; मात्र कारागृहात या उलट घडत असल्याने गृह मंत्रालय तसेच केंद्रीय मंत्रालय यांच्यात बैठक आणि चर्चा झाल्यानंतर मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांना सोडण्याचे ठरले होते. त्यानुसार सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना जामीनावर सोडण्यासाठी निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाने अकोला मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ६० कैद्यांना जामीन मंजूर केल्यानंतर कारागृह प्रशासनाने या ६० कैद्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यासाठी कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी कैद्यांची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूची भीती प्रचंड असून, हा संसर्ग तीव्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे कारागृहात एकाच ठिकाणी शेकडो कैदी असल्याने त्यांना या आजाराची लागण होऊ नये म्हणून गृह मंत्रालयाने सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपींना जामीनावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अधीन राहून अकोला कारागृहातील ६० कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.- अंकुश सदाफुलेकारागृह अधीक्षकमध्यवर्ती कारागृह, अकोला.