- विलास बोरचाटे लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा फाटा : अकोट तालुक्यातील अंबोडा येथील फासेपारधी समाजाचे भोसले व पवार कुटुंब उदरनिर्वाहाकरिता नाशिक येथे वास्तव्यास होते. बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या या कुटुंबावर लॉकडाउनमुळे उपासमारीची पाळी आली. त्यामुळे घर गाठण्यासाठी सुरू केलेला ६०० कि.मी.चा पायी प्रवास पाय रक्ताळले तरी संपत नव्हता. २ मे रोजी सायंकाळी १६ दिवस प्रवासानंतर त्यांनी निंबा फाटा गाठले; मात्र आता निंबा फाटा येथून आंबोडा येथील घर ४० किमीवरच असल्याची माहिती मिळताच या कुटुंबाचे चेहºयावर आपण फार मोठा पल्ला गाठल्याचा आनंद दिसत होता. भुकेची व्याकुळता होती.कोरोनाच्या महामारीच्या पृष्ठभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाउन घोषित झाले आणि सर्व उद्योगधंदे ठप्प झाले.स्थलांतरित मोलमजुरी करून पोट भरणाºया मजुरांवर तर आभाळच कोसळले. अशीच परिस्थिती नाशिक येथे बांधकाम मजूर म्हणून काम करणाºया अकोट तालुक्यातील आंबोडा येथील दीपक भोसले (३५) त्यांची सात महिन्यांची गर्भवती पत्नी शिवगंगा भोसले, भाऊ बिरजू भोसले, मुली सारिका पाच वर्षे, दिया तीन वर्षे व मुलगा दीपक एक वर्ष यासह पवार कुटुंबातील वदळबाई रतन पवार (५५), आकाश पवार, पत्नी हलवा आकाश पवार, मुलगा रोहित वय ८, मुलगी शिक्षा ४, मुलगी मिक्षा २ वर्षे अशा १२ जणांचा गरीब परिवार मोलमजुरी करून आपले पोट भरायचा.या कुटुंबाला पोसणाºया दीपक, बिरजू व आकाश यांचे लॉकडाउनमुळे हातचे काम गेले. जवळ पैसा नाही, अन्नधान्य नाही. महिना उलटूनही लॉकडाउन संपत नसल्यामुळे या दोन्ही परिवाराने नाइलाजास्तव नाशिक येथून अकोट तालुक्यातील आंबोडा गाव गाठण्याचा निश्चय केला आणि सुरू झाला ६०० कि.मी.चा पायी प्रवास.चिमुकली मुले म्हातारी आई व गर्भवती पत्नीसह दररोज ३० ते ४० किलोमीटर पायपीट करीत मजल दरमजल करीत त्यांनी १६ दिवसांच्या प्रवासानंतर गुरुवारी सायंकाळी निंबा फाटा गाठले. येथून आंबोडा ४० कि.मी. असल्याचे कळताच आपण घराजवळ आल्याचे व फार मोठा पल्ला गाठल्याचा आनंद झाला होता; मात्र उपाशीपोटी असल्यामुळे त्यांनी निंबा फाटा येथे विसावा घेतला.
दानशूरांची मदतया भुकेलेल्या कुटुंबाची निंबा येथील गोपालशेट चितलांगे यांनी जेवणाची व्यवस्था केली, तर सायंकाळची चूल पेटावी म्हणून कवठा येथील स्वस्त धान्य दुकानदार पुरुषोत्तम घ्यारे यांनी त्यांना २० किलो तांदूळ मोफत दिले. लॉकडाउनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचा स्वगृही परतण्याकरिता शासनाने निर्णय घेतला आहे; मात्र आॅनलाइन अर्जाच्या माहितीअभावी भोसले व पवार यांच्यासारखी अनेक गरीब कुटुंबे आजही राष्ट्रीय महामार्गावर घर गाठण्यासाठी पायपीट करीत असल्याचे भयानक वास्तवही नाकारता येणार नाही.