अकोला : राज्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या अकोला मंडळातील पाचही जिल्ह्यांसाठी कोविशिल्डचे जवळपास ७९ हजार डोस उपलब्ध झाले होते. पहिल्या टप्प्यातीलच उर्वरित लाभार्थींसाठी आरोग्य विभागाच्या अकोला मंडळाला ६१ हजार डोस प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हानिहाय या डोसचे लवकरच वितरण केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोविड लसीकरणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली, मात्र दुसऱ्या दिवशीच काही लाभार्थ्यांना सौम्य रिॲक्शन जाणवले होते. त्यामुळे अनेकांनी लस घेण्यास टाळल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी आरोग्य विभागाच्या अकोला मंडळासाठी कोविशिल्ड लसीचे ७९ हजार डोस मिळाले होते. याच टप्प्यातील उर्वरित लाभार्थींसाठी कोविशिल्ड लसीचे आणखी ६१ हजार डोस अकोला मंडळाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. ही लस आरोग्य उपसंचालक कार्यालयात पोहोचली असून लवकरच विभागातील पाचही जिल्ह्यांत त्यांचे वितरण केले जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत लस वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
जिल्हानिहाय लसीचे वितरण
जिल्हा - वितरीत होणारे लसीचे डोस
अकोला - ९,०००
अमरावती - १४,५००
बुलडाणा - १७,५००
वाशिम - ५०००
यवतमाळ - १५,०००
पहिल्या टप्प्यातील एकूण लाभार्थींसाठी लसीचे काही डोस यापूर्वीच मिळाले होते. त्यानंतरच विभागातील पाचही जिल्ह्यात लसीकरणास सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील उर्वरित लाभार्थींसाठी आणखी लस उपलब्ध झाली असून, ती लवकरच विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वितरित केली जाणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला