अतुल जयस्वाल, अकोला : अनधिकृतपणे वीज जोडणी घेऊन महावितरणला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्यांना जरब बसावी म्हणून महावितरणकडून सातत्याने मोहिमा राबवून कारवाई केली जात असली तरी वीजचोरीच्या घटना कमी होत नसल्याचे वास्तव आहे. अकोला शहरात २०२२-२३ या आर्थीक वर्षात ६१२ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यापूर्वी २०२१-२२ मध्ये ५५१ वीज चोरी पकडण्यात आल्या होत्या. वीजचोरट्यांना कारवाईचा धाक उरला नसल्याने वीज चोरीचा आलेख चढताच असल्याचे दिसून येत आहे. महावितरणकडून अकोला शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान एप्रिल-२०२२ ते मार्च-२०२३ या १२ महिन्यांत ६१२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात मीटरमध्ये छेडछाड करणे ,मीटर बंद पाडणे,मीटर दुरून बंद करण्यासाठी रिमोटचा वापर करणे,मीटरच्या मागच्या बाजूने छीद्र पाडत मीटरमध्ये रोध निर्माण करून मीटर बंद पाडणे किंवा मीटरची गती संत करणे असे अफलातून प्रकार उघडकीस आले आहे. या सर्व ग्राहकांना ५ कोटी १७ लाख रुपये वीजचोरीची बिले देण्यात आली आहेत. त्यापैकी ४५७ वीज चोरी प्रकरणात तडजोड शुल्कासह ३ कोटी ३१ लाखाची वीजबिले भरण्यात आली आहेत, परंतू अजूनही पैसे भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या १३५ प्रकरणात कायदेशीर करवाई करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी ५५१ प्रकरणे उघड
वर्ष २०२१ -२२ मध्ये वीज चोरीचे ५५१ प्रकरणे उघड करण्यात आली होती. त्यामध्ये एकूण ४ कोटी ५८ लाख रूपयाची वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या तुलनेत वर्ष २०२२ -२३ मध्ये वीज चोरीच्या प्रकरणात वाढ झाली असल्याने शहरातच नाही तर परिमंडलातील तीनही जिल्ह्यात महावितरणकडून यापुढे अधिक तीव्रपणे मोहिम राबविण्याचे निर्देश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्याकडून देण्यात आले आहेत.
अकोला शहर विभागात गेल्या वर्षभरात ६१२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी ५ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तडजोड शुल्क भरून वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या वीज चोरीच्या प्रकरणात कायदेशिर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. -सुनील कळमकर, कार्यकारी अभियंता, अकोला शहर विभाग, महावितरण