अकोला: जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी पटसंख्येच्या अभावी अतिरिक्त ठरलेल्या ६२ अतिरिक्त शिक्षकांचे ४ डिसेंबर रोजी शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. गुरुवारी या ६२ शिक्षकांना समायोजन केलेल्या शाळांवरील पदस्थापनेचे आदेश शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिले.गत काही दिवसांपासून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अतिरिक्त शिक्षकांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर त्यांचे विविध शाळांवरील रिक्त पदांवर समायोजन करण्यात आले. अतिरिक्त शिक्षकांना शाळांमधील रिक्त पदांवर रूजू करून घेण्याचे आदेश संब्ंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. ज्या संस्था अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून घेणार नाहीत किंवा शिक्षकांना सामावून घेण्यास नकार देतील. त्या संस्थांची पदे तत्काळ व्यपगत करून संबंधित शिक्षकांचे पुन्हा अन्यत्र समायोजन करण्यात येईल आणि अशा संस्थांना देण्यात येणारे वेतनेतर अनुदानसुद्धा थांबविण्यात येणार आहे, तसेच जिल्हा स्तरावर समायोजन झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत. त्यांचे वेतन अदा करण्यात येणार नाही, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)