लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील आठ महिन्यांत ६२ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. विशेष म्हणजे यासोबतच विनयभंग झालेल्या महिला-मुलींचीही संख्या ३०० च्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे़ मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना न्यायालयातून जन्मठेप, १० वर्षांपेक्षा अधिक कारावास, अशा प्रकारच्या शिक्षा झाल्याने अत्याचाराच्या घटना गत काही महिन्यांपासून कमी झाल्याचे वास्तव आहे़
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून पाहिजे तेवढे प्रयत्न केले जातात. यासोबतच गुन्हेगारीने डोकेवर काढू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक जी़ श्रीधर आणि अपर पोलीस अधीक्षक माेनिका राऊत या जिल्ह्यावर कटाक्षाने नजर ठेवून आहेत. असे जरी असले तरी जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार चिंतेचा विषय बनत आहे. विशेष म्हणजे आता महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्यात येत असल्याने अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसत असल्याची माहिती आहे़
६२ महिलांवर झाले अत्याचार
जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६२ महिलांवर अत्याचार झाले आहेत.
यामध्ये बहुतांश प्रकरणे ही ग्रामीण भागातील असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवणे आता गरजेचे झालेले आहे.
पुढील काळात याबाबत कोणती पावले उचलली जातात याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासाची गती वाढत असताना दुसरीकडे त्याच तुलनेत गुन्हेही घडत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत वाढ
जिल्ह्यात २०२१ या वर्षातील आठ महिन्यांत ६२ महिलांवर अत्याचार झाले आहेत. तर २०२० या वर्षातील आठ महिन्यांत ही आकडेवारी ४३ एवढी होती. तेव्हा जिल्ह्यात महिला, युवतींवर हाेत असलेल्या अत्याचारावर राेख लावण्यासाठी पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी विविध उपक्रम सुरू केले असून, नराधमांच्या नांग्या ठेचण्यासाठी कठाेर पावले उचलली आहेत़
३०० पेक्षा अधिक विनयभंगांची नोंद
जिल्ह्यात अत्याचारांबरोबरच विनयभंगाच्या घटनांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत तब्बल ३०० पेक्षा महिला-मुलींचे विनयभंग झाले असल्याची नोंद आहे. २०२० या वर्षात ही संख्या यापेक्षा अधिक हाेती, अशी माहिती आहे़ तर तपासही शंभर टक्के पूर्ण झाला असून यामधील गुन्हेगारांना बेड्या ठाेकण्यात आल्या आहेत़
कामगिरी उल्लेखनीय
जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढले असले तरी दुसरीकडे मात्र, पोलिसांच्या तपासाची गतीही उल्लेखनीय आहे. कारण, झालेल्या ६२ अत्याचारांपैकी सर्व प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांंना यश आले आहे.