सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तत्त्वत: आणि निकषानुसार शेतकर्यांना कर्जमाफी देताना ३0 जून २0१६ पर्यंत कर्ज थकीत असणार्यांच्या यादीतून पहिल्याच टप्प्यात ३२,0८३, तर अर्ज दाखल केल्यानंतर ३0,९५७ खातेधारक वगळल्याची माहिती आहे. एकूण ६३,0४0 हजार शेतकर्यांना पहिल्याच टप्प्यात वगळून शासनाने झटका दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीचा लाभ देताना शेतकर्यांना भीक नको पण कुत्रे आवर, म्हणण्याची वेळ आणली. कर्जमाफीच्या निकषांची चाळणी लावून, ५0 टक्क्यांपेक्षा अधिक कर्जदार शेतकरी आधीच बाद करण्यात आले. त्याची प्रचिती अकोला जिल्ह्यातील अपात्र शेतकरी संख्येवरून येते. शासन निर्णय झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ३0 जून २0१६ पर्यंत थकीत असलेल्या शेतकर्यांची संख्या मागवण्यात आली. अकोला जिल्ह्यात एकूण २,७९,000 पैकी २,0२,00३ शेतकरी त्यासाठी पहिल्या टप्प्यात पात्र समजण्यात आले. त्यानंतर सर्वच बँकांकडून ढोबळमानाचा आकडा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यात एकूण १,६९,९२0 एवढे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे पुढे आले. त्या सर्व शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे सांगितल्यानंतर ती संख्या आता १,३८,९६३ वर स्थिरावली आहे. त्या शेतकर्यांची आता निकषानुसार देय लाभासाठी पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये आणखी २५ ते ३0 टक्के शेतकरी गळण्याची शक्यता आहे. अंतिमत: लाभ मिळण्यासाठी एकूण अर्जदार संख्येच्या ५0 टक्केही शेतकरी पात्र ठरणार की नाही, ही भीती आता निर्माण झाली आहे.
मदतीचा हात ‘देणार’ की ‘दाखविणार’!निकषानुसार नियमित कर्ज भरणारे, पुनर्गठण करून कर्जाचा हप्ता भरणारे, त्यांना देय असलेल्या कर्जमाफी लाभाच्या कोणत्या योजनेत बसतात, यावरच प्रत्यक्ष लाभ पदरात पडणार आहे. त्यामुळे एवढा गाजावाजा झालेल्या योजनेतून शेतकर्यांना खरोखर मदतीचा हात दिला जातो की हात दाखवला जातो, हे लवकरच पुढे येणार आहे.
अर्ज दाखल करताना शेतकर्यांनी दिलेल्या माहितीच्या पडताळणीतून कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थीच्या प्राथमिक याद्यांची तयारी वेगात सुरू आहे. त्या याद्यातील खातेदारांना शासन निर्देशानुसार ठरलेल्या वेळी लाभ दिला जाईल. - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक. -