अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. त्यामध्ये अकोला शहरातील ३१ केंद्रांवर जिल्ह्यातील ६ हजार ७४५ उमेदवारांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा दिली असून, १ हजार ४११ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते.अकोला शहरातील ३१ केंद्रांवर १७ फेबु्रवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘एमपीएससी’ची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील ८ हजार १५६ परीक्षार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यापैकी ६ हजार ७४५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. उर्वरित १ हजार ४११ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेच्या कामासाठी ३१ केंद्रप्रमुख, १२८ पर्यवेक्षक, ४०२ समवेक्षक आणि सात संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. परीक्षा नियंत्रक म्हणून प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.चुकीच्या पर्यायाने विद्यार्थ्यांचा गोंधळराज्यसेवा परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये चुकीचे पर्याय असल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. ए प्रश्नसंच असलेल्या विद्यार्थ्यांना ७६ व्या क्रमांकावर जोड्या जुळवासंदर्भात प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर गंगापूर (नाशिक) हे एकाच पर्यायात होते. त्या पर्यायातील इतर उत्तरे मात्र जुळत नाहीत. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा याचे उत्तर या पर्यायात आर्वी, असा चुकीचा उल्लेख आहे. इतर पर्यायही चुकीचे असल्याने या प्रश्नाचे दोन गुण विद्यार्थ्यांना मिळतात किंवा नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. दुसºया पेपरच्या ए परीक्षा सेट असलेल्या विद्यार्थ्यांना ४१ व्या क्रमांकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे १ आणि ३ क्रमांकाचे पर्याय सारखेच होते.