अकोला: अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्हयातील विविध भागांत घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पूरग्रस्त ६ हजार ७८६ कुटुंबांना शासनामार्फत तातडीच्या सानुग्रह मदतीचा आधार देण्यात येणार आहे. त्यामध्ये पूरबाधित कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या सानुग्रह मदतीच्या धनादेशांचे वाटप जिल्हा प्रशासनामार्फत बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील शेती व पिकांसह घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामध्ये अकोला शहरासह जिल्ह्यातील ३९९ गावांमध्ये ६ हजार ७८६ घरांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनामार्फत घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर घरांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरबाधित कुटुंबांना शासनाच्या तातडीच्या सानुग्रह मदतीचा आधार देण्यात येणार आहे. बाधित कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या सानुग्रह मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. सानुग्रह मदत वाटपासाठी जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालय स्तरावर आवश्यक असलेला निधी वितरित करण्यात आला आहे.
अतिवृष्टी तडाख्यात नुकसान
झालेल्या घरांची अशी आहे संख्या!
तालुका घरांची संख्या
अकोला ५,२४५
बार्शिटाकळी १९७
बाळापूर १,१८८
अकोट १३०
तेल्हारा १३
मूर्तिजापूर १३
..................................................
एकूण ६,७८६
नुकसान झालेल्या घरांचे असे आहे वास्तव!
एकूण बाधित गावे
३९९
नुकसान झालेल्या घरांची संख्या
६७८६
अंशत: नुकसान झालेल्या घरांची संख्या
६,२१६
पूर्णत: नुकसान झालेल्या घरांची संख्या
१८४
पंचनामे झालेल्या घरांची संख्या
६,४००
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ६ हजार ७८६ घरांचे नुकसान झाले असून, आतापर्यंत ६ हजार ४०० घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित घरांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, बाधित कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे सानुग्रह मदतीचे धनादेश वाटप करण्याची प्रक्रिया दोन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.
संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.