अकोला : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिीत अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी पुरात अडकलेल्या ६८ जणांना सुखरूप वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कामगिरी शोध व बचाव पथकांच्या वतीने करण्यात आली.
मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अकोला शहरातील खडकी व कौलखेड भागात पुरात अडकलेल्या ४० जणांना शोध व बचाव पथकाद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
अकोला तालुक्यातील उगवा येथे पुरामुळे शेतात अडकलेल्या २ जणांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने सुरक्षित बाहेर काढले.
बार्शिटाकळी तालुक्यात दोनद व सिंदखेड येथे पुरात अडकलेल्या १७ जणांना स्थानिक शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले.
बाळापूर तालुक्यात रिधोरा येथील नाल्याच्या पुरात अडकलेल्या ९ जणांना पुरातून बाहेर काढण्याचे बचावकार्य करण्यात आले.
‘एसडीआरएफ’चे पथक
अकोल्यात दाखल !
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत शोध व बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक पाचारण करण्यात आले आहे. त्यानुसार नागपूर येथील ‘एसडीआरएफ’चे पथक गुरुवारी पहाटे अकोल्यात दाखल झाले असून, उगवा येथे शेतात पुरामुळे अडकलेल्या दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्याची कामगिरी केली.
जिल्ह्यातील विविध भागांत पुरात अडकलेल्या ६८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचे बचावकार्य करण्यात आले असून, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात घरांचे आणि इतर नुकसानाचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.