संतोष येलकर/अकोला: दुष्काळग्रस्त गावांसाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या मदतीमध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी केवळ ६ हजार ८00 रुपये मदत दिली जाणार आहे. अमरावती विभागातील १ हजार ४७७ गावांमधील शेतकर्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या पृष्ठभूमीवर खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या राज्यातील १५ हजार ७८७ गावांसाठी दुष्काळी मदतीचे पॅकेज शासनामार्फत गत ३0 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. ७ जानेवारी २0१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी मदतीचे वाटप निश्चित करण्यात आले. त्यानुसार गत १३ मे २0१५ च्या शासन निर्णयानुसार मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये दुष्काळग्रस्त १५ हजार ७८७ गावांमध्ये कापूस पीक वगळून इतर सर्व कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टर केवळ ६ हजार ८00 रुपये प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टर र्मयादेपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. तर आश्वासित जलसिंचन योजनेखालील शेतीसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ५00 रुपयांप्रमाणे २ हेक्टर र्मयादेपर्यंत मदत जाहीर करण्यात आली. शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीनुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांतील एकूण ७ हजार २४४ गावांपैकी बुलडाणा, अकोला व यवतमाळ या तीनच जिल्ह्यातील केवळ १ हजार ४७७ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी १९१ कोटी ७ लाखांचा मदतनिधी शासनामार्फत प्राप्त झाला आहे. उर्वरित गावांमधील शेतकरी दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच, कोरडवाहू शेतकर्यांना हेक्टरी मिळणारी ६ हजार ८00 रुपयांची मदतही तोकडी आहे.
मदत वाटपाचे नियोजन सुरू!
दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध झाला; मात्र मदतनिधी वाटपासंदर्भात ७ जानेवारी रोजी शासन निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयांकडे प्राप्त झाला. या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या याद्या तयार करून, मदत निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन, संबंधित जिल्हा प्रशासनमार्फत सुरू करण्यात येत आहे.