देशी कट्टा, पिस्तूल व अशा प्रकारच्या घातक अग्निशस्त्रांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या शस्त्र तस्करांचे जिल्ह्यात माेठे नेटवर्क आहे़ पाेलिसांना गुंगारा देऊन ते या शस्त्रांची अवैधरीत्या विक्री करीत असल्याने याच शस्त्रांंच्या माध्यमातून अनेकांचे हत्याकांड घडल्याचेही वास्तव आहे़ अकाेल्यात गत काही महिन्यांपूर्वी खदान व्यावसायिक अग्रवाल यांची देशी कट्टा अवैधरीत्या खरेदी करून हत्या केल्याचे उघड झाले हाेते़ त्यानंतर पाेलिसांनी जिल्हाभर माेहीम राबवून बहुतांश शस्त्र तस्करांना सळाे की पळाे करून साेडत त्यांच्याकडून सुमारे ६८९ शस्त्रे जप्त केली आहेत़ आता हे शस्त्र तस्कर पाेलिसांच्या दबावाने अकाेल्याच्या बाहेरच हे व्यवहार करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे़ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शस्त्र तस्करांचे या गोरखधंद्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययाेजना केल्या़ त्यानंतर शस्त्र तस्करांनी बुलडाणा जिल्ह्यातून हे नेटवर्क ऑपरेट करणे सुरू केल्याची माहिती आहे़
शस्त्रांचे दाेन कारखाने उद्ध्वस्त
पाेलीस अधीक्षक यांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पाेलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने रामदासपेठ व अकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शस्त्रांची अवैधरीत्या निर्मिती करणारा कारखानाच उद्ध्वस्त केला आहे़ यासाेबतच खदान परिसरातूनही शस्त्रांचा माेठा साठा वारंवार जप्त केला आहे़ रामदासपेठेतील तलवार, खंजीर व चाकू बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर शस्त्र तस्करांच्या रॅकेटचा नायनाट करण्याचा प्रयत्न पाेलिसांनी केला आहे़
अग्रवाल हत्याकांड अवैध शस्त्र खरेदीने
खदान व्यावसायिक अग्रवाल यांची देशी कट्ट्याने गाेळ्या झाडून हत्या करण्यात आली हाेती़ त्यांच्याच खदानवर कामाला असलेल्या कामगार व वाहनचालकांनी अवैध शस्त्र खरेदी करून अग्रवाल यांची हत्या केली हाेती़ अशाच प्रकारे प्रसिद्ध उद्याेजक किशाेर खत्री यांचीही हत्या शस्त्राच्या अवैध खरेदीनंतरच करण्यात आली हाेती़
या शस्त्रांचा अधिक समावेश
तलवार, चाकू, खंजीर, देशी कट्टा, पिस्तूल, कत्ता यासह विविध शस्त्रांची माेठ्या प्रमाणात तस्करी करून त्याची विक्री करणारे रॅकेटच जिल्हाभर सक्रिय आहे़ मात्र गत काही दिवसांपासून हे रॅकेट भूमिगत असल्याची माहिती आहे़ पोलिसांनी केेलेल्या कारवाईनंतर तस्करांनी त्यांचे केंद्र बदलल्याची माहिती सूत्रांनी दिली़
शस्त्र घेऊन सामान्य नागरिकांना धमकावणारे व खंडणी मागणाऱ्यांच्या विराेधात तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या़ त्यामुळे शस्त्र खरेदी करणाऱ्या टाेळ्यांवर एमपीडीए, दाेन वर्ष हद्दपारी व प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत़ मात्र त्यानंतरही काही प्रमाणात हा गोरखधंदा सुुरू असल्याने शस्त्र तस्करांवर छापेमारी करण्यात आली़ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून शस्त्रांचा माेठा साठा जप्त करण्यात आला आहे़