अकोला: जनावरांमध्ये ‘लम्पी’ विषाणूजन्य त्वचारोगाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत गत महिनाभरापासून जिल्ह्यात लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात ६९ हजार २३९ गोवंशीय जनावरांना लसीकरण करण्यात आले.
जनावरांमध्ये लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची साथ पसरली आहे. जिल्ह्यातील जनावरांमध्ये पसरणारा हा विषाणूजन्य त्वचारोग नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता जिल्हा परिसरात सेस फंडातून आणि जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर ‘गोट फाॅक्स ’ लस खरेदी करण्यात आली असून, जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत गत महिनाभरापासून जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांना लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ६९ हजार २२९ गाेवंशीय जनावरांना ‘गोट फाॅक्स’ लसीकरण करण्यात आले.पशुपालकांच्या घरोघरी जाऊन आणि शिबीरे घेऊन पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांमार्फत जनावरांना ‘लम्पी’ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे.