अकोला, दि. २६-जिल्हय़ातील धरणांमध्ये उपलब्ध जलसाठय़ात यावर्षी विविध पाणीपुरवठा योजनांसाठी ६९.७८ दशलक्ष घनमीटर पाणी बुधवारी जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये अकोला शहर, एमआयडीसी, मूर्तिजापूर शहर आणि खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांसाठी २८.९९ दशलक्ष घनमीटर पाणी काटेपूर्णा धरणातून आरक्षित करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हा पाणी वाटप समितीच्या बैठकीत जिल्हय़ातील धरणांमधील पाणी साठय़ातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामध्ये महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहर, एमआयडीसी, मूर्तिजापूर शहर, खांबोरा प्रोदशिक पाणीपुरवठा योजना आणि मस्त्य बीज केंद्रासाठी २८.९९ दशलक्ष घनमीटर, वान धरणातून अकोट शहर, तेल्हारा शहर, ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १९.८६ दशलक्ष घनमीटर, उमा धरणातून लंघापूर पाणीपुरवठा योजनेसाठी 0.७0 दशलक्ष घनमीटर, मोर्णा धरणातून पातूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 0.६0 दशलक्ष घनमीटर, कसुरा कोल्हापुरी बंधार्यातून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस् थानसाठी 0.७५ दशलक्ष घनमीटर, कुंभारी तलावातून मलकापूर पाणीपुरवठा योजनेसाठी 0.६३ दशलक्ष घनमीटर आणि पारस बॅरेजमधून पारस औष्णिक वीज केंद्रासाठी १८.२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पाणी वाटप समितीच्या सभेला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेश सोळंके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
धरणांतील ६९.७८ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित!
By admin | Published: October 27, 2016 3:31 AM