- रवी दामोदर
रात्रीची वेळ, देवाची आराधना, दुःख निवारण्याची प्रार्थना अन् पावसाला सुरुवात झाली. काही वेळानंतर विजांचा प्रकाश कावळे कडकडाट झाला अन् जीव वाचविण्यासाठी बायको- पोरीसह सभामंडपाचा आसरा घेतला, तोच सोसाट्याचा वारा सुटल्याने कडुलिंबाचे झाड त्याच सभामंडपावर कोसळल्याने मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी बघितल्याची माहिती या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले जखमी प्रकाश दशरथ कावळे (रा.चांगापूर, जि. अमरावती) यांनी दिली. अपघातात सुदैवाने आमचे प्राण वाचले मात्र काहींचा मृत्यू झाल्याचे दुःख आम्हाला असल्याचे सांगितले. बाळापूर तालुक्यातील पारस येथे रविवार दि.९ एप्रिल रोजी बाबूजी महाराज संस्थानात आयोजित कार्यक्रमासाठी शेकडो भाविक जमले होते.
आरतीचा कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटल्याने कडुलिंबाचे झाड सभा मंडपावर कोसळल्याने त्या मंडपाखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला, तर २५ च्यावर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या जखमींशी 'लोकमत'ने संवाद साधताच त्यांनी काळजाचा ठोका चुकविणारी आपबीती कथन केली.
घटनेत हे आहेत जखमी
पारस येथील घटनेत कोमल जाधव, रुखमाबाई तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, भागीरथी गुलाबराव लांडे, आरती रणसिंगे, कोशल्याबाई इंगळे, सुभद्राबाई वानखडे, दिवाकर इंगळे, सुनंदा पांडे, शामराव आठवले, गणेश तायडे, लक्ष्मण बुटे, रामभाऊ कसूरकर, रुखमाबाई शालिकराम तायडे, सुरेखा कांबळे, संकेत बुटे. शांताबाई तामसकर, प्रकाश कावळे, सुरेखा कावळे, कनिष्का कावळे, मालूबाई काळे, सुधीर कसरकार आदींसह २५ ते ३० जण जखमी झाले होते.
जीएमसीत जखमींवर उपचार सुरु
पारस येथील घटनेत जखमी झालेल्या २५ ते ३० जणांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. यावेळी वंचितचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई, कृष्णा घाटोळ, राहुल सानप, संकेत शिरसाट, मनीष भाटोडे, प्रवीण खरात, ऋषी गायगोळे, अमित तेलगोटे, जय निदाने, नीलेश वरोटे यांनी मदतकार्य केले. जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृत्यूच्या दारातून परतलो....
पारस येथे यात्रेत सहभागी झालो होतो. सभामंडपात आरती सुरु असतानाच अचानक सोसाट्याचा वारा सुटून झाड मंडपावर कोसळले. सर्व एवढ्या अचानक झालं की समजलंच नाही. सोबत असलेल्या नातेवाइकांना वाचविण्यासाठी त्यांना मिठीत घेतले, अन् ते टिनशेड अंगावर कोसळले, त्या खाली दबल्याने मृत्यूच्या दारात पोहोचलो होतो, परंतु सुदैवाने वाचलो.- दिवाकर मधुकर इंगळे, बुलढाणा
मदतीसाठी देवच धावून आला...
अचानक टिनशेड अंगावर कोसळले. काहीच समजत नव्हते, माझ्यासह अनेक त्या टिनशेडखाली दबलो होते. वाचवा रे वाचवा अशा विनवण्या करीत होते. तेच देवदूत धावून आले अन् आम्हाला बाहेर काढले.- भागीरथी लांडे, पारस
....मृत्यू जवळून पाहिला
पारस येथे नातीसोबत आली होती. संस्थानमध्ये कार्यक्रम सुरु झाला अन् प्रसाद वाटप सुरु होते. बाहेर पाऊस होत असल्याने टीनशेडचा आसरा घेतला. नंतर झाड टिनशेडवर पडल्याने त्या टिनशेडमध्ये दबल्या गेले. नातीला वाचविण्यासाठी आरडा-ओरड केली अन् देवदूतांनी धावून येत आम्हाला वाचविले. या घटनेमुळे मृत्यूला जवळून पाहिले.- रुखमाबाई तायडे, बुलढाणा