नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली असून, पहिल्या टप्प्यातील यादीत अल्पसंख्याक शाळा वगळता मराठी शाळांमधील ७0 शिक्षकांचा समावेश करण्यात आला. ही यादी पुण्यातील शिक्षण आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. जिल्हय़ातील अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन होणार असल्याने, माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाची माहिती मागविली असून, ही माहिती शाळांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. शिक्षण विभागाने २0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन करण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांच्या नाव, शाळा, आरक्षणासह यादी तयार केली आहे. या यादीमध्ये पहिल्या टप्प्यात मराठी शाळांमधील ६७ शिक्षक आणि ३ उर्दू शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यापूर्वीच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी नोंदविलेल्या आक्षेप, हरकतींनुसार सुनावणी घेतल्या होत्या. शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांची यादी पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आली असून, शिक्षण आयुक्तांनी यादीला मान्यता दिल्यावर अतिरिक्त शिक्षकांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतरच शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन करण्यात येईल. असे उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी स्पष्ट केले. गतवर्षी जिल्हय़ामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यंदासुद्धा मराठी शाळा व अल्पसंख्याक शाळांमधील १३६ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. दुसर्या टप्प्यात अल्पसंख्याक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी दिली.
अतिरिक्त शिक्षकांची यादी मान्यतेसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आली असून, यादीला मान्यता मिळाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. पसंतीक्रमानुसार अतिरिक्त शिक्षकांनी निवडलेल्या शाळांमधील रिक्त पदांवर त्यांचे समायोजन करण्यात येईल. उर्वरित अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर समायोजन होईल. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग