लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सध्या एकूण ३७० कैदी असून यामध्ये विविध शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांमध्ये जास्त म्हणजेच तब्बल ७० टक्के प्रमाण हे तरुण कैद्यांचे असल्याची माहिती समाेर आली आहे. यासाेबतच महिलांसाठी असलेल्या कारागृहात अत्यंत अल्प कैदी असल्याची माहिती आहे.
खून, दराेडा, लूटमार, फसवणूक व शेतीच्या हाणामारी प्रकरणांमध्ये अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सध्या ३७७ कैदी आहेत. यामधील बहुतांश कैदी असे आहेत की त्यांना जामिनासाठी कुणीही मदत केलेली नाही. केवळ क्षुल्लक कारणावरुन कैद्यांच्या हातून गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. या ३७७ कैद्यांपैकी तब्बल १०० च्या आसपास कैदी हे खुनातील आराेपी असल्याची माहिती आहे. तर त्यानंतर चाेरी, लूटमार, फसवणूक, आणि बलात्कार व विनयभंग प्रकरणात आराेपी असल्याची माहिती समाेर आली आहे. काही महिलाही विविध गुन्ह्याखाली कैदी असून त्यांचे प्रमाण मात्र कमी आहे. जिल्हा कारागृहात बंदीवान असलेल्या कैद्यांच्या हातून शेतीचे वाद, कौटुंबिक कलह आणि क्षुल्लक कारण यातूनच बहुतांश गुन्हे घडल्याचे सूत्रांनी सांगितले. ३७७ मध्ये सर्वाधिक कैदी हे तरुण आहेत. शेती, भावकीचे वाद, मालमत्तांच्या कारणातून हाणामारी शिवाय, गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. एकूण कैद्यांपैकी पुरुष कैद्यांची संख्या जास्त आहे. मादकपदार्थांच्या तस्करी प्रकरणात ७ जण कारागृहात आहेत. गुन्हेगारीचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरी आणि ९ इतर गुन्ह्यांच्या घटनांचे सत्र सुरुच आहे.
- जिल्हा कारागृहात एकूण कैदी ३७७
- जवळपास २८४ कैदी १८ ते ३५ वयाेगटातील
- जवळपास ५६ कैदी ३५ ते ५० वयाेगटातील
- जवळपास ३७ कैदी ५० पेक्षा जास्त वयाेगटातील
जिल्ह्यात फसवणूक व शेतीचे गुन्हे
जिल्ह्यात फसवणूक व शेतीच्या कारणावरून आपसात झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये खून, प्राणघातक हल्ला तसेच काैटुंबिक प्रकरणामध्येही माेठे गुन्हे घडल्याचे वास्तव आहे. या प्रकरणातील जास्त आराेपी कारागृहात असून त्यामधील काहीजण पॅराेलवर बाहेर असल्याची माहिती आहे.
काैटुंबिक कलहाचे गुन्हे
काैटुंबिक कलहाचे तसेच माहेर व सासर वाद यासह पती-पत्नी आणि भावंडातील संपत्तीच्या वादाचे गुन्हे जास्त आहेत. या गुन्ह्यातील आराेपींची संख्याही अधिक असल्याने कारागृहात अशा कैद्यांचाच भरणा अधिक आहे.
काेराेनामुळे कैदी बाहेर
काेराेनामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी शासनाने त्यांना बाहेर साेडण्यासाठी निर्णय घेतला हाेता. त्यानुसार आता काही कैद्यांना जामिनावर साेडण्यात आले हाेते. मात्र आता त्या कैद्यांनाही कारागृहात परत पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.