लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दसरा-दिवाळीसारख्या मोठ्या सणांमध्ये मिठाई तसेच पेढ्याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असून, यासाठी आवश्यक असलेला खवा (मावा) परराज्यातून आयात करण्यात येत असतानाच अत्यंत निकृष्ट तसेच दर्जाहीन खवा राजस्थान येथून रेल्वेने अकोल्यात आल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून तब्बल ७०० किलो खवा जप्त केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली आहे.राजस्थान येथून दर्जाहीन असलेला खवा घाणेरड्या डब्यांमध्ये पॅक करून अकोल्यात आणण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक रावसाहेब वाकडे यांना मिळाली. यावरून सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी गोपनीय माहितीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी, गजानन गोरे यांनी सिंधी कॅम्प पक्की खोली येथील एका घरातून आरोपी गोविंदसिंग राजपुरोहित याच्याकडून परराज्यातून आलेला कुंदा (मीठा खवा) सुमारे ७०० किलो किंमत १ लाख १९ हजार रुपये जप्त केला. त्यानंतर या खव्याचा नमुना घेण्यात आला असून, आरोपी गोविंदसिंह राजपूत याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. गोड खवा जिल्ह्यातील स्वीट मार्ट व्यावसायिकांकडून पेढा व इतर मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येत आहे. सदर खवा हा राजस्थान येथून जुन्या वापरलेल्या, तुटलेल्या, गंजलेल्या टिन डब्यात आणण्यात आल्याने तो आरोग्यास प्रचंड घातक असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांनी दिली. या डब्यावर उत्पादन तारखेचा उल्लेख नसून, अस्वच्छ वातावरणात वाहतूक व साठवणूक होत असल्याने खवा दर्जाहीन असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. हा खवा प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून, पुढील कारवाई निश्चित होणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त लोभसिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सणासुदीच्या काळात निकृष्ट व मिश्रण असलेल्या खव्याची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी याबाबत दक्षता बाळगून असून, अनेक स्वीट मार्ट व मिठाईच्या दुकानातील नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही मिठाई विक्रेत्याने निकृष्ट दर्जाचा खवा वापरल्यास त्यांच्यावर क ठोर कारवाई करण्यात येईल.- रावसाहेब वाकडे, अन्न सुरक्षा अधिकारी.
राजस्थानमधून आणलेला दर्जाहीन ७०० किलो खवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:03 PM