अकोला: माहिती अधिकारात दाखल द्वितीय अपिलाची प्रलंबित सात हजार प्रकरणे येत्या एप्रिलपर्यंत निकाली काढण्याचे ‘टार्गेट’ राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने निश्चित केले आहे. त्यामध्ये खंडपीठ अंतर्गत पाच जिल्ह्यातील माहिती अधिकारातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे.
राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठ अंतर्गत अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ इत्यादी पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महसूल,पोलीस, शिक्षण, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) आरोग्य आदी विभागांतर्गत माहिती अधिकारातील द्वितीय अपिलाची प्रकरणे राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठात दाखल करण्यात येतात. माहिती अधिकारातील दाखल अपील प्रकरणांपैकी सात हजार प्रकरणे सद्यस्थितीत प्रलंबित आहेत. ही प्रलंबित प्रकरणे येत्या एप्रिलपर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने ठरविले आहे. त्यासाठी दररोज ६५ ते ७० प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजनही माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाने केले.
राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठात विविध विभागांसंबंधी सद्यस्थितीत सात हजार अपील प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे येत्या एप्रिलपर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी दररोज ६५ ते ७० प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- संभाजी सरकुंडे, माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ, राज्य माहिती आयोग.