अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यात ७० हजार ९३७ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसह अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील २ लाख ६४ हजार ५५३ रेशनकार्डधारक कुटुंबांना मोफत रेशन वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये अनेकांकडे टीव्ही, फ्रिज व बाईक असूनही, त्यांना मोफत रेशनचे वाटप करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब रेशनकार्ड धारकांना दरमहा मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थाअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड धारकांसह प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील ७० हजार ९३७ कुटुंबांसह प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशनकार्डधारक २ लाख ६४ हजार ५५३ कुटुंबांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये अनेकांकडे टीव्ही, फ्रिज व बाईक असली तरी, त्यांना मोफत रेशनचे वाटप केले जात आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या
...........................
एकूण रेशनकार्डधारक
४४४५३८
दारिद्र्यरेषेखालील कार्डधारक
७०९३७
यादीत गोंधळ, कारण...
दारिद्र्यरेषेखालील, प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशनकार्डधारक कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ देण्यात येत आहे. मोफत धान्य वाटपाच्या निकषात न बसणाऱ्या अनेक रेशनकार्ड धारकांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास पडताळणी केल्यानंतर संबंधित रेशनकार्ड धारकाचे नाव मोफत धान्य वाटपाच्या यादीतून कमी करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा विभागामार्फत केली जाते. त्यानुषंगाने गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात मोफत धान्य वाटपाच्या यादीतून काही रेशनकार्ड धारकांना वगळण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
दारिद्र्यरेषेखालीसाठीचे निकष काय?
सार्वजनिक वितरण व्यवस्थाअंतर्गत ज्या रेशनकार्डधारक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ११ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा रेशनकार्ड धारकांचा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश करून, धान्य वाटप करण्यात येते, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी सांगितले.
दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड धारकांचा आढावाच घेतला गेला नाही!
दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड धारकांचा गत दहा वर्षांपासून आढावाच घेतला गेला नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड धारकांच्या संख्येत कोणताही बदल झाला नाही. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड धारकांचा आढावा घेण्याची बाब प्रस्तावित आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
कोण गरीब, कोण श्रीमंत; २.६४ लाख कुटुंबांना मोफत रेशन !
जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील ७० हजार ९३७ रेशनकार्डधारक कुटुंबांना तसेच प्राधान्य गटातील १ लाख ४८ हजार ७४८ रेशनकार्डधारक कुटुंबांना आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत ४४ हजार ८६८ रेशनकार्डधारक कुटुंबांसह जिल्ह्यात एकूण २ लाख ६४ हजार रेशनकार्डधारक कुटुंबांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे मोफत धान्य वाटप करण्यात येत असलेल्या लाभार्थी रेशनकार्डधारक कुटुंबांपैकी कोण गरीब आणि कोण श्रीमंत, हे ठरविणे कठीण असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसह अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील एकूण २ लाख ६४ हजार ५५३ रेशनकार्डधारक कुटुंबांना दरमहा मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. दरिद्र्यरेषेखालील रेशनकार्ड धारकांचा आढावा आठ ते दहा वर्षांपासून घेण्यात आलेला नाही; मात्र शासनाच्या निर्देशानुसार दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारक कुटुंबांचा आढावा घेण्याचे प्रस्तावित आहे.
- बी. यु. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी.