अकोला: घराच्या बांधकाम नकाशाला परवानगी घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेत हेलपाटे घ्यावे लागतात. नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा व त्यांना तातडीने परवानगी मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी २२ फेब्रुवारी रोजी मनपात शिबिराचे आयोजन करून ७१ घरांचे बांधकाम नकाशे मंजूर केले. त्यावेळी नागरिकांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केले.कमर्शियल कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट असो किंवा घराच्या बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नकाशा दाखल केल्यानंतर प्रस्तावांमध्ये अनेकदा त्रुटी निघतात. त्रुटींची पूर्तता करताना सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच दमछाक होते. मालमत्ताधारकांनी त्रुटींची पूर्तता केल्यानंतर सदर प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपात नगररचना विभागाच्या माध्यमातून शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यात आले. त्यावेळी ७१ घरांचे नकाशे मंजूर करण्यात आले. शिबिरात नगररचनाकार संजय पवार, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे तसेच क्रेडाई संघटनेचे नितीन हिरूळकर, जितेंद्र पातूरकर, किशोर अग्रवाल, पुरुषोत्तम मालाणी तसेच नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.