खेट्री/चान्नी (अकोला) : आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून राजस्थान राज्यातील मुळ गावी परत जात असलेल्या मजुरांचा ट्रक पातुर तालुक्यातील चान्नी पोलिसांनी उमरा येथे शुक्रवारी रात्री उशीरा पकडला. या ट्रकमध्ये ७१ मजूर असून, त्या सर्वांना सद्या चान्नी येथील जय बजरंग विद्यालयात ठेवण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात संचारबंदी लागू असून, अनेक जण अडकून पडले आहेत. राजस्थान राज्यातील असलेले अनेक मजूर हैदराबाद येथे अडकून पडले आहेत. यापैकी ७१ मजूर २१ जी बी १३१४ क्रमांकाच्या ट्रकद्वारे राजस्थान राज्यातील त्यांच्या मुळ गावाकडे निघाले होते. त्यांचा ट्रक पातुर तालुक्यातील चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आला असता, पोलिसांनी शुक्रवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास उमरा या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान ट्रक रोखला. तपासणी केली असता या ट्रकमध्ये ७१ मजूर प्रवास करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ट्रकसह सर्व मजुरांना ताब्यात घेतले व चान्नी पोलिस ठाण्यात आणले. या सर्व मजुरांना सद्या जय बजरंग विद्यालयात ठेवण्यात आले असून, त्यांची चहा-नाश्ताची सोय पोलिसांनी केली आहे. दुपारपर्यंत या मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे चान्नी पोलिसांनी सांगितले.
हैदराबादहून राजस्थानकडे ट्रकमधून जाणाऱ्या ७१ मजुरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:46 AM