अकोला : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून मंगळवारी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ७१२ गावांचा समावेश असून, दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील या गावांमध्ये टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, उपाययोजनांना सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या या पाच तालुक्यांत ७२१ गावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या पाच तालुक्यांतील ७१२ गावांमध्ये शासनाच्या विविध उपाययोजना लागू होणार आहेत.दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाच तालुक्यांत अशी आहेत गावे!तालुका गावेअकोला १८२तेल्हारा १०६बाळापूर १०३मूर्तिजापूर १६४बार्शीटाकळी १५७..................................एकूण ७१२‘या’ उपाययोजना होणार लागू!दुष्काळसदृश गावांसाठी जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज देयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.सत्यमापनाचा अहवाल पाठविला शासनाकडे!जिल्ह्यातील दुष्काळसदृश पाच तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल व कृषी विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून, दुष्काळसदृश परिस्थितीच्या सत्यमापनाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी दुपारी शासनाकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती, पिकांचे उत्पादन, पिकांचे नुकसान व इतर प्रकारच्या माहितीचा समावेश आहे.