अकोला : अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३३५ जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ७२.५५ टक्के मतदान झाले असून, निवडणूक रिंगणातील ९२५ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्राॅिनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) सीलबंद झाले. सोमवार, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या १२८ प्रभागांत ९२५ जागांसाठी १६७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान प्रक्रियेत तालुक्यातील एकूण ९९ हजार ८३५ मतदारांपैकी ७२ हजार ४३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३८ हजार ५४८ पुरुष व ३३ हजार ८८५ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात सरासरी ७२.५५ टक्के मतदान झाले असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली. मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणातील ९२५ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये सीलबंद झाले आहे. १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय धान्य गोदामात सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाकडे लक्ष लागले आहे.
‘या’ ग्रामपंचायतींसाठी झाले मतदान!
अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे, सांगळूद बु., धोतर्डी, यावलखेड, बोरगाव खुर्द, दोडकी, कानशिवणी, पातूर नंदापूर, सांगवी खुर्द, गांधीग्राम, दहीहांडा, हिंगणी बु., लोणाग्रा, मोरगाव भाकरे, खांबोरा, आगर, उगवा, घुसर, आपोती बु., म्हातोडी, कोळंबी, कुरणखेड, पैलपाडा, दापुरा, म्हैसांग, आपातापा, बोरगाव मंजू, काैलखेड जहाँगीर, पळसो बु., डोंगरगाव, चांदूर, चिखलगाव, म्हैसपूर, गोरेगाव खुर्द व माझोड इत्यादी ३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले.