अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उप-विभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार १३ मेपर्यंत गत आठ दिवसांच्या कालावधीत अकोला तालुक्यात ७३ घरगुती लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात लागू आलेले 'लॉकडाउन ' आणि गत २४ मार्चपासून राज्यभरात लागू असलेल्या संचारबंदीच्या पृष्ठभूमिवर लग्न समारंभ लांबणीवर पडले आहेत. त्यानुषंगाने साधेपणाने व घरगुती लग्न समारंभांना परवानगी देण्यासाठी परवानगी अधिकारी म्हणून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गत ४ मे रोजी दिला. त्यानुसार घरगुती व साधेपणाने होणाºया लग्नसमारंभात वर-वधूसह प्रत्येक लग्नात दहा लोकांची उपस्थिती, मास्कचा वापर व 'फिजिकल डिस्टन्सिंग ' राखण्यासह इतर अटी व शर्तींच्या अधीन राहून, ५ ते १३ मे दरम्यान या आठ दिवसांच्या कालावधीत अकोला तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात ७३ घरगुती लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या आदेशानुसार संबंधित लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे.