अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून अखेरपर्यंतच्या कालावधीकरिता ७ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा कृती आराखडा मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कृती आराखड्यात जिल्ह्यातील ३१० गावांत पाणीटंचाई निवारणाच्या विविध ३६८ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जून ते जून अखेरपर्यंत या कालावधीत जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ३१० गावांसाठी विविध ३६० उपाययोजनांचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २९ डिसेंबर रोजी दिला. पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांकरिता ७ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा खर्च आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला.आराखड्यात प्रस्तावित अशा आहेत उपाययोजना!पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात विविध ३६८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. त्यामध्ये १८६ विहिरींचे अधिग्रहण, २३ टँकरद्वारे पाणी पुरवठा, ५८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नऊ तात्पुरत्या पूरक नळ योजना, ५० नवीन विंधन विहिरी व ४२ नवीन कूपनलिकांचा समावेश आहे.