संतोष वानखडे / वाशिम : संपूर्ण देशभर महत्वाचे ओळखपत्र म्हणून नावारूपास आलेल्या आधार कार्डच्या नोंदणीपासून अमरावती विभागातील ७४ टक्के चिमुकले अद्यापही वंचित आहेत. ३0 नोव्हेंबरअखेर या विभागातील १0 लाखांपैकी २.६४ लाख चिमुकल्यांचे आधार कार्ड काढण्यात आले.देशभर आधारकार्ड हा अधिकृत पुरावा मानला जातो. २0१0 पासून आधारकार्डची नोंदणी सुरू आहे. नोंदणी मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्याची एकूण लोकसंख्या एक कोटी १९ लाख ९ हजार ३९९ आहे. यापैकी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची संख्या १0 लाख ४५२ आहे. यामध्ये अमरावती जिल्हा दोन लाख ३२ हजार ८४२, यवतमाळ दोन लाख ४७ हजार १७४, बुलडाणा दोन लाख ४९ हजार ३६९, अकोला एक लाख ५८ हजार १0 आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख १३ हजार ५७ बालकांचा समावेश आहे. या बालकांची आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी प्रत्येक शाळा व अंगणवाडी केंद्रात सुविधा उपलब्ध करण्यात आली. मात्र, पालकांमध्ये अद्यापही जागरूकता नसल्याने आधार नोंदणीचा वेग मंदावला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ३0 नोव्हेंबरअखेर २६.४३ टक्के बालकांची आधार नोंदणी झाली. यवतमाळ जिल्ह्यात ७१ हजार ५१२, अमरावती ४५ हजार ४७८, बुलडाणा ७५ हजार ६६२, अकोला २३ हजार ८९९ आणि वाशिम जिल्ह्यातील ४७ हजार ८६५ बालकांचा यामध्ये समोवश आहे. आधार नोंदणीचा टप्पा शेवटच्या चरणात असतानाही बालकांची नोंदणी समाधानकारक नसल्याचे दिसून येते. *१८ वर्षे वयोगटाची टक्केवारी ७४पाच ते १८ वर्षे वयोगटातील एकूण ७४.३४ टक्के जणांची आधार नोंदणी ३0 नोव्हेंबरपर्यंंत झाली. अमरावती विभागात या वयोगटातील मुलांची एकूण संख्या २९ लाख ७३ हजार ८७२ आहे. यापैकी २२ लाख १0 हजार ७९९ मुलांनी आधार कार्ड काढले असून उर्वरीत २५ टक्के मुलांचे आधार कार्ड काढणे बाकी आहे.
*वाशिम जिल्हा आघाडीवरअमरावती विभागात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील आधार नोंदणीत वाशिम जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येते. एकूण एक लाख १३ हजार ५७ पैकी ४७ हजार ८६५ बालकांची आधार नोंदणी झाली असून ४२.३४ अशी टक्केवारी आहे. सर्वात कमी नोंदणी अकोला जिल्ह्यात केवळ १५.१३ टक्के अशी आहे.