अकोला : यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून, पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
सतत पाऊस आणि नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गत जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत करण्यात आले असून, जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पुराच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान!
प्रशासनाच्या अहवालानुसार पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात मूग पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ३० हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील मूग पिकाचे नुकसान झाले असून, त्यापाठोपाठ १३ हजार ८६९ हेक्टर क्षेत्रावरील उडीद, ३ हजार ४३४ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व २ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.
पाऊस आणि पुरामुळे जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
- उदयकुमार नलवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी