तालुक्यातील सस्ती, आलेगाव, दिग्रस बुद्रुक, दिग्रस खुर्द, बेलुरा खुर्द, तांदळी बुद्रुक, बेलुरा बुद्रुक, पाष्टूल विवरा, चतारी, उमरा, राहेर, शिर्ला, मलकापूर, देऊळगाव, चान्नी, खानापूर, भंडारज खुर्द, चरणगाव, मळसूर, सायवणी, पिंपळखुटा, चांगेफळ या गावांत मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ३७,४६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ८७ मतदान केंद्रांतील पोलिंग पार्ट्या ईव्हीएम मशीन घेऊन तहसील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत पोहोचत होत्या. त्यामुळे गावनिहाय मतदानाची टक्केवारी प्राप्त होऊ शकली नाही. तालुक्यात तब्बल २२१ जागांसाठी ४७४ उमेदवार रिंगणात उभे होते. सर्वांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. शिर्ला ग्रामपंचायतीमध्ये पातूर नगर परिषदेचा बहुतांशी भाग समाविष्ट झाल्यामुळे पातूर नगर परिषदमध्ये असणाऱ्या सर्व दिग्गज नेत्यांनी शिर्ला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे शिर्ला ग्रामपंचायतीची निवडणूक संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरली. निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी अकोला पोलीस उपअधीक्षक मोनिका राऊत व बाळापूर पोलीस उपविभागीय अधिकारी तथा पातूर ठाणेदार हरीश गवळी यांनी मतदान केंद्रांचा आढावा घेतला. तालुक्यात कुठेही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती तहसीलदार दीपक बाजड यांनी दिली.
(फोटो)