अकोला : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शासनाच्या २२ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील आठ आमदारांना स्थानिक विकासासाठी प्रत्येकी एक कोटीप्रमाणे आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधी येत्या मार्चअखेरपर्यंत विकासकामांवर खर्च करावा लागणार आहे.
विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमदारांना स्थानिक विकासासाठी प्रतिवर्ष शासनाकडून प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी मिळतो. चालू आर्थिक वर्षात प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी आमदारांना यापूर्वी वितरीत करण्यात आला आहे. शासनाच्या नियोजन विभागाच्या २२ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. त्यानुसार विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य असलेल्या जिल्ह्यातील आठ आमदारांना स्थानिक विकासासाठी आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीतून आमदारांकडून मतदारसंघांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. प्राप्त झालेला निधी येत्या मार्चअखेरपर्यंत स्थानिक विकासकामांसाठी खर्च करावयाचा आहे.
जिल्ह्यातील विधानसभा सदस्य
०५
विधान परिषद सदस्य
०३
रस्ते, पाणीपुरवठा, सभागृहांच्या
कामांवर होणार निधी खर्च!
आमदारांना स्थानिक विकासासाठी प्राप्त होणारा निधी रस्ते विकास, नळपाणीपुरवठा योजना, हातपंप, सामाजिक सभागृह बांधकाम, सामाजिक सांस्कृतिक सभामंडप, व्यायामशाळा बांधकाम, क्रीडा साहित्य खरेदी, ग्रंथालयांसाठी पुस्तक खरेदी, अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संगणक खरेदी आदी कामांसाठी खर्च करण्यात येतो. त्यामध्ये रस्ते विकास, पाणीपुरवठा व सामाजिक सभागृह बांधकामांवर सर्वाधिक निधी खर्च होतो.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत नियोजन विभागाच्या २२ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील विधानसभा व विधान परिषद सदस्य असलेल्या जिल्ह्यातील आमदारांना आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधी मार्चअखेरपर्यंत स्थानिक विकासकामांवर खर्च करावयाचा आहे.
गिरीश शास्त्री
जिल्हा नियोजन अधिकारी